सिंधुदुर्ग, 6 जानेवारी (हिं.स.) महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण यांच्यावतीने दिला जाणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे वितरण आज मराठी पत्रकार दिना निमित्ताने जांभेकरांच्या जन्मगावी अर्थात पोंभुर्ले येथील स्मारकात सकाळी थाटात संपन्न झाला. राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष श्री. रविंद्र बेडकिहाळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळेस नऊ जणांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ठाण्यातून निघणार्या दैनिक जनादेशचे झुंजार संपादक तथा शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे सदस्य कैलाश म्हापदी यांना विशेष राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्म गावी म्हणजे पोम्बुर्ले येथे गेली 30 वर्ष हा पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न होत आहे. पुरस्काराच्या प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी वाजत गाजत स्मारकात आणण्यात आली व या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त रवींद्र बेडकिहाळ यांनी संस्थेची माहिती देऊन बाळशास्त्री जांभेकरांचे मुंबईतही स्मारक व्हावे, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार संघटनांनी त्यात हातभार लावावा असे आवाहन केले. तर लवकरच मुंबईमध्ये या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन जांभेकरांचे मुंबईतलं स्मारक मार्गी लावण्याचा शब्द ना. चव्हाण यांनी उपस्थित पत्रकारांना दिला. ना. रवींद्र चव्हाण यांनी आपण दरवर्षी न चुकता पत्रकार दिनासाठी पोंबुर्ले येथे येऊ, असा शब्द पत्रकारांना देतानाच पत्रकार दिनाचे कार्यक्रम विशेषतः महापुरुष आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती – पुण्यतिथीचे कार्यक्रम शासकीय कामात व्हावेत, त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित होते.
ज्या महाराष्ट्राने देशाला पत्रकारितेच सर्वात मोठं हत्यार दिलं, त्या महाराष्ट्रातच सध्या वर्तमानपत्रांची स्थिती अतिशय दयनीय आहे. राज्यात एकही कागदाची कंपनी शिल्लक राहिलेली नसून ’ ब ’ आणि ’ क ’ दर्जाची दैनिक एक एक दिवस मरणाच्या वाटेकडे सरकत असल्याचे श्री. म्हापदी यांनी पत्रकारांचं आणि सरकारचे लक्ष वेधून शेतकर्यांप्रमाणेच आजारी दैनिकं आणि विशेषत: जिल्हा दैनिकं आणि सरकार यात मदतीचा आदान-प्रदान व्हायला हवं, याकडे लक्ष वेधले.
फक्त अधिस्वीकृती कार्ड धारकानांच नव्हे तर दर्या खोर्यात ऊन, वादळ, पावसात वाड्या वस्त्यांवरती काम करणारे सगळ्याच पत्रकारांना महाराष्ट्र सरकारने आरोग्याचे हेल्थ कार्ड द्यावं. नुकतीच घोषणा झालेली पेन्शन योजना फक्त ऍक्रेडिशन वाल्या पत्रकारांनाच नव्हे तर 25-30 वर्ष सातत्याने बातमीदारी केलेल्या प्रत्येक पत्रकारासाठी ती राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. चौथा स्तंभ फक्त बोलण्यामध्ये आणि श्रद्धे पुरता शिल्लक राहिला असून तो सरकारी योजनांमध्ये आणि सरकारी धोरणांमध्ये सुद्धा यावा, तरच तो खर्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरेल, असे खडे बोलही श्री म्हापदी यांनी या निमित्ताने सुनावले.
याप्रसंगी ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार माधव कदम (सिंधुदुर्ग), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रशांत कदम (नवी दिल्ली), सागर देशपांडे (पुणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार – डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांना गौरविण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
