भंडारा १६ नोव्हेंबर (हिं. स.) : सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीप्रमाणे भंडारा जिल्ह्यात घटना घडली आहे. सख्ख्या मोठ्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे घडली आहे. सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाची धारदार शस्त्राने वार करून खून केला. आकाश भोयर (३१) असे मृतकाचे नाव आहे. तर राहुल भोयर, मारोती न्यायमूर्ती अशी आरोपींची नावे आहेत.
लाखनी तालुक्यातील सावरी जवळील खेडेपार रोडलगत ५० फुट अंतरावर एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती गावातीलच रहिवाशी मंगेश टिचकुले यांनी फोन करून लाखनी पोलिसांना दिली. घटनेची माहीती मिळताच लाखनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.खेडेपार रस्त्यावर आरोपींनी खून करून मृतदेह अंदाजे ५० फुट आत शेतात फेकून दिला होता. सावरी-खेडेपार रस्त्यावर मृतकाच्या रक्ताचा सडा पडलेला असताना लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशियत आरोपी राहुल भोयरला अटक केली. राहूल याला खाकी वर्दीचा धाक दाखवला असताना नेहमीच्या भांडणाला वैतागून नागपूर येथील मित्राच्या मदतीने भावाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान समाचार
