
अकोला, 25 जानेवारी (हिं.स.)।
अकोला शहरातील बाल निरीक्षण गृहातून रहस्यमरित्या बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदान पोलिसांनी तब्बल १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे येथून सुखरूप शोध लावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी पोलीस स्टेशन खदान येथे फिर्यादी मोतीराम गजानन तेंलग (वय २७, रा. नादरूग्ण, ता. दर्यापूर, जि. अमरावती) यांनी तक्रार दाखल केली होती. ते अकोला येथील बाल निरीक्षण गृह व बालगृहात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून, त्या ठिकाणी दाखल असलेले दोन विद्यार्थी तुषार पुरुषोत्तम वडणे (वय १० वर्ष) आणि सुशांत योगेश बांगर (वय ११ वर्ष) हे दिनांक ०७ जानेवारी रोजी सकाळी शाळेसाठी गेले होते. मात्र शाळा सुटल्यानंतर ते बालगृहात परतले नाहीत.
सर्वत्र शोध घेऊनही मुले मिळून न आल्याने खदान पोलीस ठाण्यात अप. नं. २६/२०२६, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अकोला मा. श्री. अर्चित चांडक यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चार विशेष शोध पथके तयार करण्याचे आदेश दिले.
या शोध मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्या नेतृत्वाखाली एक पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि पोलीस स्टेशन खदान स्तरावर दोन पथके अशी चार पथके सक्रिय करण्यात आली. मुलांकडे मोबाईल नसल्यामुळे शोध कार्य अधिक आव्हानात्मक ठरले.
मागील १४ दिवसांत पोलिसांनी अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, शेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अशा एकूण ७ जिल्ह्यांत शोध मोहीम राबवली. या काळात पोलिसांनी सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास, शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरिक व नातेवाईकांशी सतत संपर्क साधत अखेर पुणे येथून दोन्ही मुलांना सुखरूप ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदर्शन पाटील, परि. सहा. पोलीस अधीक्षक इशानी आनंद तसेच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकातील सपोनि पुरुषोत्तम ठाकरे, तसेच पोलीस अंमलदार संजय वानखडे, गिरीष विर, मंगेश खेडकर, संतोष गावंडे, भुषन मोरे, निलेश खंडारे, अमित दुबे, अभिमन्यु सदांशिव, वैभव कस्तुरे, स्वप्नील वानखडे, रोहित पवार, संदीप काटकर, अमर पवार व मनोज दुबे यांनी या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
खदान पोलिसांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, मुलांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
