सोलापूर, 17 नोव्हेंबर, ( हिं.स) शहरातील जेलरोड, एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात ठिकाणी चोरी, घरफोडी करणारा चोरटा एमआयडीसी पोलिसांनी बीड येथून जेरबंद केला. तिलकसिंग गब्बरसिंग टाक असे त्या संशयिताचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे वयाच्या ३०व्या वर्षी त्याच्या नावे तब्बल १७३ गुन्हे दाखल आहेत.चोरट्याने सोलापुरातील सुनील नगर येथील बालाजी ज्वेलर्स फोडले. या प्रकरणी विनोद सुंचू यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी खबऱ्यांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला. त्याचवेळी पोलिस हवालदार सुहास अर्जुन व काशिनाथ वाघे या दोघांना चोरट्याबद्दल माहिती मिळाली.ज्वेलर्स दुकान फोडून पसार झालेला संशयित आरोपी तिलकसिंग टाक हा सध्या राहायला पुण्यातील हडपसर परिसरात रामटेकडी येथे आहे. तो धारूर (जि. बीड) येथील एसटी स्टॅण्डवर येणार असल्याचे समजले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी आपल्या पथकासह धारूर गाठले. एसटी स्टॅण्डवर सापळा रचून थांबलेल्या पोलिसांना काहीवेळाने एक तरुण एसटी बसमधून उतरून जाताना दिसला. खबऱ्याने पोलिसांकडून पाहून इशारा केला आणि तत्काळ गराडा घालून तिलकसिंगला पकडले. तेथून त्याला थेट सोलापुरात आणण्यात आले. त्याच्याकडे कसून तपास केल्यावर त्याने शहरातील सात घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हिंदुस्थान समाचार
