मुंबई, 19 ऑगस्ट (हिं.स.)। भारतातील रासायनिक उद्योगात नाविन्यता, शाश्वतता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करीत गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने (जीआयजी) राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन नुकतेच केले. गोदरेज इंडस्ट्रीज (केमिकल्स) आणि अॅस्टेक लाइफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या परिषदेत उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांनी भारतीय रसायनशास्त्राच्या भविष्यासंदर्भात विचारविनिमय केला.
‘भारतीय रासायनिक उद्योगातील नावीन्य व वाढ घडवणे’ या विषयावरील संशोधन व विकास, डिजिटलायझेशन आणि भविष्यासाठी सुसज्ज मनुष्यबळाचा विकास यांच्या माध्यमातून जागतिक रासायनिक मूल्यसाखळीत भारताची भूमिका अधिक सक्षम करण्यावर या परिषदेचा भर होता.
‘गोदरेज अॅग्रोवेट’चे कार्यकारी संचालक व ‘अॅस्टेक लाइफसायन्सेस’चे व्यवस्थापकीय संचालक बर्जिस गोदरेज, तसेच ‘गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप’चे अध्यक्ष नादिर गोदरेज यांनी या परिषदेत शाश्वत भविष्य घडवण्यात रसायनशास्त्राची भूमिका मांडली. गोदरेज इंडस्ट्रीज (केमिकल्स) कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शर्मा यांनी उद्योगातील लवचिकता, उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य आणि बॅकएंड उत्पादक देश म्हणून गणना होत असलेल्या भारताचे जागतिक नाविन्यता नेतृत्व केंद्रामध्ये रूपांतर यांसारख्या विषयांवर प्रभावी चर्चा घडवून आणली.
या परिषदेत ‘सीटीआयईआर इनोव्हेशन रिपोर्ट’चे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ‘संशोधन व विकास या क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वा’विषयीची डेटा-आधारित माहिती देण्यात आली आहे.
परिषदेत आयआयटी मुंबई, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बायर क्रॉपसायन्स, बीसीजी, ईवाय, सायन्स्को इंडिया आणि इतर संस्थांमधील विचारवंतांनी मुख्य वक्ते म्हणून भाग घेतला.
‘भारताचा रासायनिक उद्योग जागतिक नेतृत्वाच्या उंबरठ्यावर आहे, आणि एकत्रितपणे नव्या कल्पनांवर काम करणे हा भारताच्या या रुपांतरामागील मुख्य आधार ठरेल,’ असा स्पष्ट संदेश परिषदेच्या समारोपावेळी उमटला.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
