मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.) एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एका कंपनीने आज आपल्या सर्वाधिक विक्रीच्या प्रमुख मॉडेलसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. कंपनी आपल्या 450X मॉडेलची नेपाळ येथे निर्यात करणार आहे. वैद्य एनर्जी या वैद्य ऑर्गनायझेशन ऑफ इंडस्ट्रीज अँड ट्रेडिंग हाउसेसच्या (व्हीओआयटीएच) उपकंपनीशी भागिदारीतून एथर या जागतिक विस्ताराची सुरुवात करत आहे. हा नेपाळमधील आघाडीचा औद्योगिक समूह असून यावर्षी नोव्हेंबरमध्ये काठमांडू येथे एक्सपिरीयन्स सेंटर सुरू केले जाणार आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत मिळालेल्या यशानंतर एथरने भारताबाहेरील बाजारपेठेत रिटेल विस्तार करण्याचे ठरवले आहे. देशातील बाजारपेठेत कंपनीच्या ४५० सीरीजमधील प्रीमियम दुचाकी इलेक्ट्रिक व्हिइकल्सचा (ईव्ही) ७५ टक्के हिस्सा आहे. नेपाळमध्ये वाहतुकीच्या हरित पर्यायांना प्राधान्य दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एथर 450X लाँच केली जाणार आहे. भारत व चीन या शेजारी देशांच्या तुलनेत नेपाळमधील बाजारपेठ लहान असली, तरी एथरसारख्या उत्पादनाची कामगिरी व स्वीकृतीचे सखोल आकलन असलेल्या ब्रँडसाठी ती आश्वासक बाजारपेठ आहे.
एथर एनर्जी आणि वैद्य एनर्जी एकत्रितपणे नेपाळी ग्राहकांसाठी उच्च कामगिरी करणाऱ्या ईव्ही सहजपणे उपलब्ध करून देत तेथील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहेत. या भागिदारीचा एक भाग म्हणून वैद्य एनर्जी नेपाळमधील एथरच्या उत्पादनांची विक्री आणि सेवेचे कामकाज हाताळणार आहे. गेल्या काही वर्षांत एथर एनर्जीने ईव्हीच्या सहज वापरासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. कंपनी याच पद्धतीने नेपाळमध्ये आपल्या रिटेल कामकाजाचा विस्तार करणार आहे. या भागिदारीचा एक भाग म्हणून वैद्य एनर्जी एथर ग्रिड्स ही फास्ट- चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करून रेंजची चिंता कमी करेल.
एथरचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी रवनीत फोकेला म्हणाले, ‘ एथरने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असून कंपनी सातत्याने आपला विकास करत आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विस्तार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. वेगवेगळ्या बाजारपेठांमधून आमच्या उत्पादनांना चांगली मागणी येत असून आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात आम्ही नेपाळमधून करत आहोत. नेपाळची वाहन बाजारपेठ वाहतुकीच्या हरित पर्यायांचा वापर करण्याविषयी जगभरात वाढत असलेल्या जागरूकतेचे प्रतीक आहे असे आम्हाला वाटते. बाजारपेठेची निर्मिती करताना आम्ही सार्वजनिक फास्ट चार्जिंग पायाभूत सुविधांचाही विस्तार करण्यास प्राधान्य देणार आहोत, कारण हीच बाब भारतात आमचे वेगळेपण ठरली. नेपाळ बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वैद्य समूहाशी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि रिटेल वाहन बाजारपेठेचे ज्ञान आमचे चाहते व ग्राहकांना अनोखा अनुभव देण्यासाठी पूरक ठरेल. ’
एथरसह झालेल्या भागिदारीविषयी वैद्य एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यांश वैद्य म्हणाले, ‘आमच्या मते प्रवास कंटाळवाणा होता कामा नये, तर तो अनुभव आनंददायी आणि लोकांच्या आयुष्यात थरार निर्माण करणारा असावा. एथर एनर्जीच्या सहकार्याने आम्ही प्रीमियम मोबिलिटी सुविधा क्षेत्रातील आमच्या ज्ञानाचा त्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हिइकल तंत्रज्ञानाशी मेळ घालणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे, आमची वाहने उत्कंठापूर्ण अनुभव देतील, शिवाय ती खर्च वाचवतील, जास्त सोयीस्कर ठरतील आणि प्रवासाचा वेळ कमी करतील. संपूर्ण यंत्रणा विकसित करण्याचे आम्ही ठरवले असून त्यादरम्यान उत्पादन, सेवा आणि पायाभूत सुविधांसह आम्ही ग्राहक अनुभवावर लक्ष केंद्रित करणार आहोत.’
वैद्य एनर्जी हा वैद्य ऑर्गनायझेशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेडिंग हाउसेसचा भाग असून तो नेपाळमधील आघाडीच्या व्यवसायांपैकी एक आहे. कंपनी ट्रेडिंग हाउसेस, औद्योगिक एंटरप्राइजेस, सेवा, बांधकाम आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी सर्व क्षेत्रांत नाविन्य आणि शाश्वतता आणण्यासाठी कार्यरत आहे. विस्तारित नेटवर्क आणि बळकट कनेक्शन्सच्या मदतीने व्हीओआयटीएच स्थानिक व्यवसाय क्षेत्रात वाट काढण्यासाठी सक्षम आहे.
आंतरराष्ट्रीय विस्ताराचा करताना एथर आपले प्रमुख 450X मॉडेल २.९ केडब्ल्यूएच आणि ३.७ केडब्ल्यूएच अशा दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध करणार आहे. 450X हे मॉडेल पार्कअसिस्ट, ऑटोहोल्ड आणि फॉलसेफ, ७ इंची टीएफटी स्क्रीन, गुगल मॅप्स इंटिग्रेशन, ९० किमीचा सर्वोच्च वेग आणि १४६ किलोमीटरची प्रमाणित श्रेणी यांसाठी प्रसिद्ध असून हे एथरचे भारतातील सर्वाधिक विक्रीचे मॉडेल आहे.
एथरचे भारतातील १०० पेक्षा जास्त शहरे व १५० एक्सपिरीयन्स सेंटर्सद्वारे दमदार रिटेल विक्री नेटवर्क कार्यरत आहे. कंपनीने १५०० पेक्षा जास्त एथर ग्रिड्स म्हणजेच वेगवान चार्जिंग पॉइंट्सची स्थापन केली आहे. एथरचे उत्पादन केंद्र ३००,००० चौरस फुटांत वसलेले असून त्यामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये प्रती वर्ष ४२०,००० युनिट्सपर्यंत उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे कंपनीला एथर 450X या आपल्या प्रमुख स्कूटरला असलेली वाढती मागणी पुरवणे शक्य होईल.
हिंदुस्थान समाचार
