नाशिक, ०६ ऑक्टोबर, (हिं.स.) – देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना या राबविण्यात येत असून त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांनी मदत करावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.
दोन दिवसीय सीएचओ परिषदेचे उद्घाटन आज शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि एस पी सिंग बघेल जी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गुजरात, कर्नाटक, गोवा, दिव- दमण, राज्यातील हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे ही दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की, आत्तापर्यंत 25 करोड 32 लाख आयुष्यमान कार्ड वितरित झाली असून पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या चार आधारस्तंभा पैकी हेल्थ आणि वेलनेस सेंटर हा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी आरोग्य सुविधा ही संकल्पना राबविण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी महत्त्वाचे काम करीत आहेत. या वेलनेस सेंटर द्वारे तळागाळातील नागरिकांपर्यंत मोफत आणि प्रभावी वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यात येतात. या सुविधा प्रभावीपणे पोचविण्यासाठी आरोग्य मेळावे घेण्यात येतात. देशात आतापर्यंत 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त आरोग्य मेळावे झाले असून त्याद्वारे लाखो रुग्णांवर उपचार झाले आहेत.
हिंदुस्थान समाचार
