नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : इराणी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. नर्गिस सध्या इराणच्या तरुंगात असून त्यांना 31 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालीय.
या वर्षीचा शांतता पुरस्कार अशा लाखो लोकांना समर्पित आहे, ज्यांनी स्त्रियांना लक्ष्य करणार्या व भेदभाव आणि दडपशाहीच्या शासनाच्या धोरणांविरुद्ध प्रदर्शन केल्याचे समितीने म्हटले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, इराणच्या नैतिकता पोलिसांच्या कोठडीत महसा जीना अमिनी यांची हत्या झाली होती. त्यानंतर इराणच्या राजवटीविरुद्ध राजकीय निदर्शने सुरू झाली. नर्गिस मोहम्मदी यांना इराणच्या शासकांनी तब्बल 13 वेळा अटक केली आहे. त्यांना 5 वेळा दोषी ठरवण्यात आले. त्यांना एकूण 31 वर्षांचा तुरुंगवास व 154 फटके मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आलीय. विशेष म्हणजे, त्या अजूनही तुरुंगातच आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, मोहम्मदी संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य पुरस्कार मिळवणाऱ्या 3 इराणी पत्रकारांपैकी एक आहेत.
गेल्या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार युक्रेन, बेलारूस आणि रशियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाऊ शकतो. इतर मागील विजेत्यांमध्ये नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मिखाईल गोर्बाचेव्ह, आंग सान स्यू की आणि संयुक्त राष्ट्रांचा समावेश आहे. या वर्षी समितीला 351 नामांकने मिळाली होती. यामध्ये 259 व्यक्ती आणि 92 संस्थांचा समावेश होता.
यापूर्वी नोबेल समितीने नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्याचा पुरस्कार दिला. बुधवारी रसायनशास्त्राचे पारितोषिक अमेरिकन शास्त्रज्ञ मौंगी बावेंडी, लुई ब्रुस आणि अलेक्सी एकिमोव्ह यांना देण्यात आले. भौतिकशास्त्राचे पारितोषिक फ्रेंच-स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ अॅन ल’हुलियर, फ्रेंच शास्त्रज्ञ पियरे अगोस्टिनी आणि हंगेरियनमध्ये जन्मलेल्या फेरेंक क्रॉझ यांना देण्यात आले. तर हंगेरियन-अमेरिकन कॅटालिन कॅरिको आणि अमेरिकन ड्रू वेइसमन यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
हिंदुस्थान समाचार
