
रायगड, 24 एप्रिल (हिं.स.) : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत वंजारपाडा गावात तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपाडा येथील गणपती मंदिराजवळील नाका परिसरात फिर्यादी महिला, जखमी साक्षीदार व आरोपी हे सर्वजण एकाच गावातील रहिवासी असून जखमी हा फिर्यादीचा भाऊ आहे. संबंधित जखमी व्यक्ती घराबाहेर बसलेली असताना आरोपी तेथे येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला. यावेळी फिर्यादी महिलेने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करत दोघांनाही घरी जाण्यास सांगितले.
मात्र, याच रागातून आरोपी घरी जाऊन तलवार घेऊन परत आला व फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी साक्षीदार मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करून डोक्यात तलवारीने वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीस न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी (पीसी) सुनावली असून या कालावधीत अधिक तपास करण्यात येणार आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 82/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 118(2), 131, 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोसई भास्कर गच्चे करीत असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आरोपीस ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने पुढील तपासाला वेग येणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)
