नाशिक, खासगी सावकारीतून वैभव देवरे याने जमिन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या इसमाला 4 लाख रुपये व्याजाने देऊन त्याला धमकावून त्याच्याकडून 28 लाख रुपये वसुल केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरे यांच्या विरोधातील तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नवीन अशोक सोनवणे (34, रा. न्यू मैत्री सोसायटी, कमोदनगर, नाशिक) हे जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच या व्यवसायात फिर्यादी सोनवणे यांना त्यांचे मित्र दीपक साळुंके हे देखील मदत करतात. फिर्यादींचे मित्र दयाराम खोडे हे जुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.
त्यानुसार फिर्यादी यांनी सुझुकी कंपनीची कार वैभव देवरे याच्याकडे गहाण ठेवून त्यापोटी 1 मार्च 2021 रोजी कोटक महिंद्र बँकेचा 2 लाख रुपयांचा चेक आरोपी वैभव देवरे याने दिला. तो चेक बँकेत वटवून 2 लाख रुपये दयाराम खोडे यांना दिले. त्यानंतर उर्वरीत 2 लाख रुपये पुन्हा वैभव देवरे याच्याकडून 10 टक्के व्याजाने घेऊन खोडे यांना दिले. देवरे याच्याकडून 4 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेऊन फिर्यादी यांचे मित्र दीपक साळुंके यांना कार खरेदीसाठी दिले होते. त्यानंतर साळुंके यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून 4 लाख रुपये तसेच जमिन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून आलेले 3 रुपये असे एकूण 7 लाख रुपये 15 मार्च 2021 रोजी वैभव देवरे याला परत केले होते.
त्यानंतर 8 दिवसांनी दीपक साळुंके याने त्याच्या आईचे सोने सोनाराकडे गहाण ठेवून 2 लाख आणले व ते वैभव देवरे याला दिले. अशी एकूण 9 लाख रुपयांची रक्कम खासगी सावकर वैभव देवरे याला व्याजापोटी परत दिली असताना देखील देवरे हा दिपक साळुंके यांना वारंवार जिवे ठार मारण्याची धमकी देत 45 लाख रुपयांची मागणी करत होता. या मागणीला व देवरेच्या त्रासाला कंटाळून साळुंके हा कुठे तरी निघून गेला. त्यानंतर साळुंके याने व्याजाने घेतलेले पैसे वसुल करण्यासाठी आरोपी वैभव देवरे याने फिर्यादी नवीन सोनवणे याच्याकडे हे पैसे वसूल करण्यासाठी आपली माणसं पाठवली. परंतु यानंतर या सगळ्या त्रासाला कंटाळून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
