सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठा १८३८ कोटींचा ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सोलापुरातील कुंभारी हद्दीत होत आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ हजार २४ घरकुलांचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ रोजी पार पडले. पण, पावणेदोन वर्षांत अवघ्या साडेतीन हजार लाभार्थींनाच घरकुलांचा ताबा मिळाला आहे. लाभार्थींना बॅंकेचे दोन लाख १० हजार रुपयांचे कर्ज व रोखीने भरायचे ४० हजार रुपये आणि स्टॅम्प ड्यूटी, रजिस्ट्रेशनचे आठ हजार रुपये भरायला नाहीत. त्यामुळे घरकुले पूर्ण असतानाही ११ हजार ४८६ लाभार्थी त्यांच्या पडक्या घरातच राहत आहेत.सोलापूर शहराजवळील कुंभारी हद्दीत ३६५ एकर परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेतून ३० हजार घरकुलांचा रे नगर प्रकल्प होत आहे. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी एक स्वतंत्र पोलिस ठाणे, ४० अंगणवाड्या, उर्दू-मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सहा शाळा मंजूर झाल्या. पण, अजूनपर्यंत त्यातील एकही बाब पूर्ण झालेली नाही. लाभार्थींना त्याठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने सध्याचा कामधंदा सोडून नव्या ठिकाणी रहायला जाणे देखील अडचणीचे ठरू शकते म्हणून लाभार्थी त्याठिकाणी रहायला गेलेले नाहीत.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
