पुणे 10 जानेवारी (हिं.स.) अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विक्रम संवत २०८० पौष शु. एकादशीला येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान सुरू आहे.
या अभियानातंर्गत अद्यापपर्यंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, माजी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अरूण कुमार सिंग, मेजर जनरल विक्रांत नाईक, पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचावक आनंद देशपांडे, एमक्युअर फार्माचे सतीश मेहता, अॅड. एस. के. जैन, नेमबाज अंजली भागवत, किर्लोस्कर समूहाचे संजय किर्लोस्कर, पंचशील रिअॅल्टीचे अतुल चोरडिया, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, उद्योजक नितीन देसाई, ऋषिकेश सावंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, डॉ. चारूदत्त आपटे व सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संपादक अभिजित पवार यांना अक्षता वितरण आणि निमंत्रण देण्यात आली आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात ११ लाखांहून अधिक घरांमध्ये हे गृहसंपर्क अभियान होणार आहे. या अभियानातंर्गत श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने २१ हजारांहून अधिक रामसेवक १ ते १५ जानेवारी २४ दरम्यान घरोघरी जाणार आहेत. शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन राम सेवक करत आहेत. व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आणि राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन रामसेवक घरोघरी जाऊन करणार आहेत.
दि. १ ते १५ जानेवारी दरम्यान हे गृहसंपर्क अभियान पूर्ण झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारीपर्यंत पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील पुणे शहरातील दोन हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्याचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, शहरातील कलाकार कट्ट्यावर विविध कलांचे सादरीकरण, सोसायटी व मंदिरांमधून रामसंकीर्तनाचा समावेश आहे. या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
