अमरावती, 1 सप्टेंबर (हिं.स.
आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या देखाव्यांचा देखावा बनला असताना, बनोसा राठीपुरा येथील प्रवीण व सौ. मीनल राठी या दाम्पत्याने आपल्या घरगुती गणेशोत्सवाला एक आगळं-वेगळं रूप दिलं आहे. त्यांनी घरातील मोठा हॉल मोकळा करून, त्यामध्ये ‘शेगाव नगरीचा राजा – गजानन महाराज’ या संकल्पनेवर आधारित २१ अध्यायांचे चित्रमय दर्शन साकारले आहे.
विशेष म्हणजे, हा देखावा वेस्ट मटेरियलचा वापर करून ‘बेस्ट’ प्रकारे साकारण्यात आला आहे. गजानन महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती, अध्यायांतील प्रसंग, आणि वातावरणनिर्मितीसाठी वापरलेलं साहित्य हे सर्व शंभर टक्के पर्यावरणपूरक व पुनर्वापरयोग्य आहे.
प्रवीण राठी यांनी सांगितले की, “व्हॉट्सअॅपवर एका अर्धवट देखाव्याचा फोटो पाहून कल्पना सुचली आणि यंदा गजानन महाराजांच्या २१ अध्यायांवर आधारित संपूर्ण देखावा साकारायचा निर्धार केला.”घरगुती गणपती असूनही, हा देखावा सार्वजनिक स्तरावर खुला ठेवावा असा भास निर्माण करणारा आहे. प्रत्येक अध्यायाला स्वतंत्र चित्रात्मक मांडणी दिली असून, त्यामध्ये धार्मिक भावनांप्रमाणे अध्यात्मिक वातावरण जपलेले आहे.या उपक्रमाचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य भडांगे सर आणि रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले आणि राठी दाम्पत्याचे अभिनंदन केले.
हा देखावा दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा देणारा आहे. ‘कलेचा वापर केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर भक्ती आणि सामाजिक संदेश देण्यासाठीही होऊ शकतो’, हे राठी कुटुंबाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
