मुंबई, 1 सप्टेंबर (हिं.स.)। आज पासून अनेक नवे नियम व बदल लागू झाले असून याचा थेट परिणाम करदाते, ग्राहक, कर्मचारी आणि प्रवासी यांच्यावर होणार आहे. सर्वप्रथम आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत सरकारने १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मूळ तारीख ३१ जुलै होती, मात्र चार्टर्ड अकाउंटंट तसेच व्यावसायिक संस्थांच्या मागणीवरून ती पुढे ढकलण्यात आली. तथापि, ज्या करदात्यांची खाती ऑडिटला पात्र आहेत त्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच ३० सप्टेंबरची मुदत लागू राहील. त्यामुळे या श्रेणीतील करदात्यांना मुदतवाढीचा फायदा मिळणार नाही.
दरम्यान, एसबीआय कार्ड कंपनीने आपल्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये बदल जाहीर केले आहेत. १ सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग, सरकारी वेबसाइट आणि काही विशिष्ट व्यापाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे लाखो कार्डधारकांना याचा परिणाम जाणवू शकतो.
टपाल सेवेतही मोठा बदल करण्यात आला आहे. इंडिया पोस्टने नोंदणीकृत पोस्ट सेवा पूर्णपणे रद्द करून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन केली आहे. १ सप्टेंबरपासून सर्व नोंदणीकृत मेल थेट स्पीड पोस्टद्वारे पाठवले जातील. त्यामुळे स्वतंत्र नोंदणीकृत पोस्ट या सेवेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) संदर्भातही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना यूपीएस निवडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख जून होती, मात्र प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे ती वाढवून सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे.
दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी विमान वाहतूक क्षेत्रालाही दिलासा दिला आहे. दिल्लीमध्ये एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) किंमत प्रति १००० लिटरला १,३०८.४१ रुपयांनी कमी करून ९०,७१३.५२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होणार असून तिकीट दरात कपात होण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी ही एक चांगली बातमी ठरू शकते.
एकूणच, सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी लागू झालेल्या या नव्या नियमांमुळे करदात्यांपासून ते बँक ग्राहक, टपाल सेवा वापरणारे नागरिक, केंद्रीय कर्मचारी आणि प्रवासी अशा विविध घटकांना थेट फटका किंवा दिलासा बसणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
