कीव, 10 ऑगस्ट (हिं.स.)।युक्रेन कोणत्याही परिस्थितीत रशियाला आपली जमीन देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी(दि.९) मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी “भूप्रदेशांची अदलाबदल” करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर झेलेन्स्की यांनी या प्रस्तावाला ठामपणे नाकारले आहे.
टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात झेलेन्स्की म्हणाले की देशाच्या संविधानात समाविष्ट असलेल्या युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेशी कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यांनी यावर भर दिला की जेव्हा युक्रेनला वाटाघाटीच्या ठिकाणी बोलण्याची संधी असेल तेव्हाच शांतता शक्य आहे. झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेन रशियाला त्याच्या कृतींचे बक्षीस देणार नाही आणि युक्रेनियन त्यांच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्यांना काहीही देणार नाहीत.”
पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील थेट भेटीबद्दल युक्रेन आणि युरोपमध्ये चिंता आहे की यामुळे कीव आणि युरोपीय हितसंबंधांना दुर्लक्षित केले जाऊ शकते. यावर झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेनला बायपास करून आणलेला कोणताही उपाय शांततेच्या विरोधात असेल. अशा उपाययोजनांमुळे काहीही मिळणार नाही. हे मृत उपाय असतील, जे कधीही काम करणार नाहीत.” युक्रेनियन अधिकाऱ्यांनी यापूर्वी एपीला खाजगीरित्या सांगितले होते की कीव अशा शांतता करारावर सहमत होऊ शकतो जो हे मान्य करतो की युक्रेन त्याचे सर्व गमावलेले प्रदेश लष्करीरित्या परत मिळवू शकत नाही.
झेलेन्स्की यांनी युक्रेनचा प्रदेश सोडण्यास औपचारिक नकार देताना म्हटले आहे की, युद्ध संपवण्यावर केंद्रित असलेल्या कोणत्याही चर्चेमध्ये युक्रेनला सहभागी करून घेतले पाहिजे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, ते १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांची भेट घेतील. ट्रम्प यांनी म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न खूप फलदायी ठरेल अशी आशा आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की ते शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांची भेट घेतील. परंतु आता झेलेन्स्कीच्या या विधानानंतर, पुतिन-ट्रम्प चर्चा यशस्वी होण्याच्या आशा धुसर होऊ लागल्या आहेत. विशेषतः अशा वेळी जेव्हा गेल्या काही आठवड्यांपासून युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांच्या संथ गतीबद्दल निराशा व्यक्त केली जात होती.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सूचित केले होते की करारात “काही प्रदेशांची अदलाबदल” शक्य असू शकते, परंतु त्यांनी त्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. क्रेमलिनशी संबंधित काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की रशिया युक्रेनमधून ते क्षेत्र सोडण्याचा प्रस्ताव देऊ शकतो जे त्यांनी आधीच जोडल्याचा दावा केलेल्या चार प्रदेशांच्या बाहेर आहेत. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की पुतिन यांच्याशी त्यांची भेट झेलेन्स्की यांच्याशी कोणत्याही चर्चेपूर्वी होईल. त्यांनी स्पष्ट केले की पुतिन यांना झेलेन्स्की यांना भेटायचे नसले तरी ते पुतिन यांना भेटण्यास तयार आहेत. परंतु ट्रम्पच्या निमंत्रणावरून पुतिन अमेरिकेला जातील की नाही याबद्दल रशियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
