गुयाना, 18 जुलै (हिं.स.)। ग्लोबल सुपर लीग (GSL) मधील स्टॅग्स आणि रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गतविजेत्या रंगपूर रायडर्सला सलग चौथा विजय मिळवता आला नाही.
गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील रायडर्स आणि गुणतालिकेत तळाशी असलेल्या सेंट्रल स्टॅग्स यांच्यातील सामना आधी १७ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. नंतर त्यात आणखी कपात करत १४ षटकांवर आणण्यात आले. मात्र, पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. या दरम्यान केवळ रायडर्सची फलंदाजी पूर्ण झाली.
रायडर्स संघ सामना सुरू होण्याआधी सशक्त तयारी आणि आव्हानाची अपेक्षा करत होता. मात्र, स्टॅग्सच्या गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त झटका दिला. ओलसर खेळपट्टी आणि गवताळ मैदान यामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. संपूर्ण संघ फक्त १३.५ षटकांत ७९ धावांवर गारद झाला. सैफ हसन आणि माहिदुल इस्लाम हेच केवळ दुहेरी आकड्यात पोहोचू शकले.
पावसाने रायडर्सला पराभवापासून वाचवलं, कारण स्टॅग्सच्या फलंदाजांना खेळण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी सामना अनिर्णीत राहिला.
आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ — रंगपूर रायडर्स आणि यजमान गुयाना अमेझॉन वॉरियर्स आमनेसामने असतील. हवामान अनुकूल राहील आणि यंदाचा ग्लोबल सुपर लीग एक जबरदस्त अंतिम सामन्याने संपन्न होईल, अशी अपेक्षा आहे .
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
