हैदराबाद, 19 जुलै (हिं.स.) – तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं (मंगलमपल्ली व्यंकटेश) यांचे निधन झाले आहे. ते ५३ वर्षांचे होते. किडनी फेल झाल्यामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फिश वेंकट यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. फिश वेंकट यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
फिश वेंकट यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे तेलुगू सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाच्या आठवणी कायम रसिकांच्या मनात राहतील.
वेंकट यांचा जन्म ३ ऑगस्ट १९७१ रोजी हैदराबाद येथे झाला होता. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. ‘गब्बर सिंग’, ‘बन्नी’, ‘अधूर्स’, ‘डीजे टिल्लू’, ‘स्लम डॉग हजबंड’ यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष स्मरणात राहतील.
त्यांची मुलगी श्रावंती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करताना सांगितले होते की, वडिलांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी सुमारे ५० लाख रुपयांची गरज आहे. काही अभिनेते आणि चाहत्यांनी मदतीचा हात दिला, पण शेवटपर्यंत अपेक्षित निधी उभा राहिला नाही. अभिनेता विश्वक सेन यांनी मात्र २ लाख रुपयांची मदत केली होती.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
