नवी दिल्ली, 11 मार्च : ईस्लाम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याला सुरुवात झालीय. भारतात मंगळवारी 12 मार्च रोजी पहिला रोजा (उपवास) असणार आहे. सौदी अरेबियामध्ये 10 मार्च रोजी संध्याकाळी चंद्र दिसला, त्यामुळे तेथील नागरिकांनी आज, सोमवार 11 मार्चपासून रोजे सुरु केले. तर भारतात 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस आहे. रमजान इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) ठेवतात.
इस्लामिक कॅलेंडरच्या आठव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिलाल म्हणजेच अर्धचंद्र दिसल्यानंतर रमजान महिन्याची सुरुवात होते. रमजान महिन्यात सकाळी सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. याला सेहरी असं म्हणतात. तर दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केली जाते आणि उपवास सोडला जातो. सौदी अरेबिया तसेच संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज, सोमवारी 11 मार्च रोजी रमजान पहिला रोजा करण्यात आला. तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये रमजान मंगळवारी सुरू होईल.मुस्लिम मान्यतेनुसार, रमजान महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे महिन्यात मुस्लीम धर्मिया रोजा ठेऊन अल्लाहची उपासना करतात.
