नवी दिल्ली, दिल्ली मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणी तेलंगणातील आमदार के. कविता यांना 15 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आलीय. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या असलेल्या कविता यांच्या चौकशीसाठी सीबीआयने 5 दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना 15 एप्रिल पर्यंतच कोठडी सुनावणी आहे.
सीबीआयचे म्हणणे आहे की मद्य धोरणाशी संबंधित षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी, पुराव्यांसह कवितांना सामोरे जाण्याची गरज आहे. ‘आप’ला लाच देण्याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.मात्र, कविता यांच्या वकिलाने सीबीआयची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास यंत्रणेवर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. एजन्सीने गुरुवारी (11 एप्रिल रोजी) कवितांना तिहार तुरुंगात अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात कविता 26 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत होत्या. रिमांड मिळाल्यानंतर कवितांना सीबीआय मुख्यालयात नेले जाईल, जिथे त्यांची चौकशी केली जाईल. यापूर्वी सीबीआयने 6 एप्रिल रोजी न्यायालयाच्या परवानगीने तिहारला जाऊन कवितांची चौकशी केली होती.
सीबीआयने कवितांना आयपीसीचे कलम 120-बी, कलम 477-ए आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 7 (सरकारी कर्मचाऱ्यांना लाच देण्यासंबंधीचे गुन्हे) अंतर्गत अटक केली आहे. ईडीने त्यांना 15 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील घरातून अटक केली होती. तर 16 मार्च रोजी राऊस ऍव्हेन्यू कोर्टाने त्यांना 23 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी 26 मार्चपर्यंत वाढवली होती. तर 26 मार्च रोजी कवितांना न्यायालयीन कोठडीत तिहारला पाठवण्यात आले होते. कविता ‘साऊथ ग्रुप’ या दारू व्यापाऱ्यांच्या गटाच्या प्रमुख सदस्य असल्याचा ईडीचा आरोप आहे. साउथ ग्रुपशी संबंधित लोकांवर दिल्लीतील दारू व्यवसायाच्या परवान्याच्या बदल्यात ‘आप’ला 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
