नवी दिल्ली, १९ डिसेंबर (हिं.स.) : दाऊद इब्राहिम जिवंत आणि ठणठणीत असून, मी त्याला रविवारी दिवसभरात अनेकदा भेटलो, असा दावा दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलने केला आहे.
भाई १००० टक्के फिट!
दाऊद रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर छोटा शकील याने भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना याचे खंडन केले. ही फेक न्यूज पाहून मलाही धक्का बसला. मात्र त्याची तब्येत उत्तम आहे. दाऊदवर विषप्रयोग केल्याचा आणि रुग्णालयात दाखल झाल्याचा इन्कार केला आहे. भाई १००० टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूने पसरवल्या जात आहेत. तसेच रविवारी दिवसभरात काही वेळा आपली व दाऊदची भेट झाल्याचा दावाही त्याने केला.
कुख्यात डॉन आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात कराचीमधील एका रुग्णालयात दोन दिवसांपासून दाखल झाल्याचे वृत्त पसरले. दाऊदवर विषप्रयोग झाला असून, तो रुग्णालयात असल्याची माहिती पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित झाली. त्यानंतर, उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्याच्यावर विषप्रयोग झाला, त्याचा मृत्यू झाला, अशाही चर्चा होत्या. ६७ वर्षीय दाऊद कराचीमधील एका रुग्णालयात भरती असून, रुग्णालयाच्या त्या मजल्यावर तो एकटाच आहे. वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि जवळचे नातेवाईक यांनाच तिथे प्रवेश असल्याचीही चर्चा दिवसभर रंगली होती. मात्र, या वृत्ताला पाकिस्तान किंवा भारत सरकारने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
गुन्हेगारीच्या जगात कसा आला दाऊद?
दाऊद इब्राहिमचं खरं नाव शेख दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्यांचे वडील शेख इब्राहिम अली कासकर हे मुंबई पोलिसांत हवालदार होते. आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी त्याला शिक्षण सोडायला लावलं होतं. यानंतर दाऊद गुन्हेगारीच्या जगात आला. आधी त्यानं तत्कालीन डॉन हाजी मस्तानसोबत काम केलं आणि नंतर त्याच्यापासून वेगळं होऊन दुबईतून काम करायला सुरुवात केली. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात असल्याचं बोललं जात आहे.
एस. हुसैन झैदी यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड एक, नाम अनेक’ या पुस्तकात दाऊदची १३ नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो ‘मुच्छाद’ म्हणून ओळखला जात होता. भारतात तो ज्यावेळी फोन करतो, त्यावेळी तो हाजी साहेब किंवा अमीर साहेबांच्या नावानं हाक मारतो.
हिंदुस्थान समाचार
