पंतप्रधानांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण
नवी दिल्ली, 04 जानेवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडा यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने खेडा यांच्यावर नोंदवलेला एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार दिला आहे. पीएम मोदींवर चुकीची टिप्पणी केल्याप्रकरणी खेडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवन खेडा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींचे पूर्ण नाव घेताना त्यांच्या वडिलांचे नाव चुकीचे उच्चारले होते. यानंतर त्यांनी चूक सुधारली, मात्र नंतर पुन्हा चुकीचे नाव वापरून खिल्ली उडवली. यानंतर भाजपने खेडा यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत माफीची मागणीही केली होती.हा खटला रद्द करण्यासाठी पवन खेरा यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातही धाव घेतली होती, परंतु तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खेडा यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
हिंदुस्थान समाचार
