
* विराटला मारली मिठी, सुरक्षारक्षकांनी घेतले ताब्यात
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांची फलंदाजी सुरू होती. त्या दरम्यान अचानक ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घातलेल्या एका पॅलिस्टिनी समर्थक तरुणाने खेळपट्टीकडे धाव घेतली आणि विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित तरुणाला तातडीने सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आणि त्याला चांदखेडा पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घडल्या प्रकाराने सामन्याच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले.
अधिक माहिती अशी की, अहमदाबादच्या स्टेडियममध्ये आज सुमारे एक लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे एकूणच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, पॅलेस्टिनी समर्थकाने सर्व सुरक्षा रक्षकांना चकवा देत चालू सामन्यादरम्यान मैदानात प्रवेश केला. ही घटना भारतीय डावाच्या १४व्या षटकात घडली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झाम्पा गोलंदाजी करत होता. तर विराट कोहली आणि लोकेश राहुल खेळपट्टीवर होते. या तरुणाने अंगात लाल रंगाची चड्डी (शॉर्ट) आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्या टी-शर्टवर समोरच्या बाजूला ‘पॅलेस्टाईनवर बॉम्ब टाकणं बंद करा’ आणि मागच्या बाजूला ‘फ्री पॅलेस्टाईन’ असा संदेश लिहिला होता.
तरुणाने यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझे नाव जॉन आहे. मी ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. मी विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला. मी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो. पॅलेस्टाईनवरील बॉम्ब हल्ले थांबवावे, असा संदेश देण्यासाठी मी हे केल्याचेही तो म्हणाला.
मागील जवळपास ४४ दिवसांपासून इस्रायल आणि हमास संघटनेत युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर इस्रायलकडून सातत्याने पॅलेस्टाईनवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत.
हिंदुस्थान समाचार
