पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस
नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर (हिं.स.) : राजधानी दिल्लीत प्रदूषणाने उच्चांक गाठला असून दिवसभर धुके पसरले होते. वाढत्या प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता आणि व्यवस्थापन आयोगाने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा (जीआरएपी) टप्पा III लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आलीय.
दिल्लीतील आनंद विहार भागातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय)आज सकाळी 740 सह वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. दिल्लीच्या सरासरी हवेच्या गुणवत्तेबद्दल विचार केल्यास ते 392 नोंदवले गेले, जे ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये येते आणि कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस होते. एका आकडेवारीनुसार, दिल्लीतील 37 क्षेत्रांपैकी किमान 18 हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवले गेले. दिल्ली एनसीआरमध्ये आपत्कालीन सेवा, सरकारी बांधकाम आणि धोरणात्मक महत्त्वाची बांधकामे याशिवाय सर्व प्रकारच्या बांधकामांवर आणि पाडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल-4 वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने आवश्यक वाटल्यास इयत्ता पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी शाळेत न जाता ऑनलाइन वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्या आहेत.
शून्य ते 50 मधील एक्यूआय ‘चांगला’ आहे, 51 ते 100 ‘समाधानकारक’ आणि 101 ते 200 ‘मध्यम’ असून 201 ते 300 ‘खराब’ आहे, 301 ते 400 ‘अतिशय वाईट’ आहे. तर 400 आणि 500 मधील एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) ‘गंभीर’ मानला जातो.
हिंदुस्थान समाचार
