उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुंबई, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सर्वप्रथम कंत्राटी भरती तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने शरद पवारांच्या मार्गदर्शनात तोच कित्ता गिरवला. कंत्राटी भरतीचे पाप भाजपप्रणीत महायुतीचे नाही असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी कंत्राटी भरतीचा ‘जीआर’ रद्द करण्याची घोषणा केली.
यासंदर्भात मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांनी कंत्राटी भरती सुरू केली तेच लोक निर्लज्ज होऊन कंत्राटी भरतीला विरोध करीत आहेत. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला होता. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढला होता. तत्कालिन काँग्रेस आणि त शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मिळून राज्यात कंत्राटी भरती केली. त्यानंतर 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. तसेच 6 हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर 2014 साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्ट साठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. त्यावेळी 1 सप्टेंबर 2021 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 15 वर्षाकरता कंत्राटी भर्तीसाठी एजन्सी तयार करण्यात आले. आमच सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट 25 टक्के जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर यात लक्ष घातले. कंत्राटी भरतीची सुरवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
