सहाराणपूर, 07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेला निवडणूक जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. उत्तरप्रदेशच्या सहारणपूर येथे आज, शनिवारी आयोजित भाजपच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरुन हे सिद्ध होते की, आजची काँग्रेस भारताला पुढे नेऊ शकत नाही. या देशातील जनतेने माझे काम पाहिले आहे. माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावावर आहे. देशातील जनतेचे स्वप्न हाच माझा संकल्प आहे. आम्ही भ्रष्टाचारावर करत असलेला हल्ला, तुमच्या चांगल्या भविष्यासाठी आहे. भ्रष्टाचारामुळे गरिबांची स्वप्ने धुळीस मिळतात. तुमच्या मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी मी रोज विरोधकांच्या शिव्या खातोय, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी राहुल गांधींच्या ‘शक्ती’विरोधातील वक्तव्यावर टीका केली. आपल्या देशात शक्तीची पूजा केली जाते. पण, इंडिया आघाडीचे लोक या शक्तीलाच आव्हान देतात, हे देशाचे दुर्दैव आहे. त्यांचा लढा शक्तीविरोधात आहे. शक्ती कोणी संपवू शकेल का? ज्यांनी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे काय हाल झाले, त्याची इतिहासाच्या पानावर नोंद आहे. गरीबांचे कल्याण, ही भाजपसाठी निवडणूक घोषणा नसून आमचे ध्येय आहे. काँग्रेस जे अनेक दशकात करू शकली नाही, ते भाजपने दोन दशकात करून दाखवले. इंडिया आघाडी कमिशनसाठी आहे, तर एनडीए मिशनसाठी असल्याचे मोदींनी सांगितले.
जेव्हा देश मोठ्या निराशा आणि संकटाच्या काळातून जात होता. तेव्हा मी तुम्हाला हमी दिली होती की, मी देशाला झुकू देणार नाही, देशाला थांबू देणार नाही. मी संकल्प केला होता की, तुमच्या आशीर्वादाने देशातील प्रत्येक शहराचा चेहरा मोहरा बदलेन. मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, मी निराशेला आशेत बदलेन, मी आशाला विश्वासात बदलेन. तुम्ही तुमचा आशावाद सोडला नाही आणि मीही मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्यामुळेच भारताचे नाव जगभरात घुमत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
