पुणे 8 ऑक्टोबर : ससून रुग्णालयात महिनोन महिने उपचार घेणाऱ्या तरुण कैद्यांच्या दुखण्यावर आता इलाज सापडला आहे. पुढील दोन दिवसांत बहुतांश रुग्णांना परत कारागृहात पाठविले जाणार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेतील, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. उपचारासाठी कैद्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. त्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आवश्यकता असणाऱ्या कोणत्याही कैद्याचे उपचार नाकारले जाणार नाही. मात्र आवश्यकता नसलेल्यांना उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात आश्रयही दिला जाणार नाही, याबाबत समितीमध्ये अत्यंत स्पष्टता होती. त्या आधारावर ससून रुग्णालयात दाखल सात कैद्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला. रुग्णाला कारागृहात परत पाठविण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेणार आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
