ठाणे, १४ जानेवारी, (हिं. स) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा (संयोजिका) सेजल संजय कदम यांनी लक्ष्मी चिरागनगरमध्ये घेतलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात रुग्णांच्या आरोग्य तपासणीबरोबरच आरोग्य जनजागृतीवर भर देण्यात आला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या योजनांची नोंदणी करण्यात आली.
ईशा नेत्रालय, प्रवाह हेल्थकेअर आणि जेनेरिक मेडिसिन यांच्या सहकार्याने लक्ष्मी चिरागनगरमध्ये शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांच्या नियमित तपासणीबरोबरच रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. वर्षा खानविलकर यांनी मधुमेहाच्या रुग्णांच्या पायाला जखमा झाल्यानंतर पीआरपीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या यशस्वी उपचारांबाबत मार्गदर्शन केले. नामांकित कंपन्यांच्या औषधांपेक्षा तब्बल ७० टक्के कमी दराने मिळणाऱ्या जेनेरिक मेडिसिनबाबत रोहिणी विभूते यांनी मुद्देसूद माहिती दिली. तर ईशा नेत्रालयाच्या डॉ. पंड्या यांनी नेत्र तपासणी करण्याबरोबरच डोळ्यांच्या काळजी घेण्याबाबतच्या टिप्स दिल्या.
केंद्र सरकारच्या योजनांचा प्रत्येक व्यक्तीला फायदा मिळविण्यासाठी भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून विविध योजनांसाठी नोंदणी करण्यात आली. खास विशेष कक्ष करून नागरिकांना आयुष्मान भारत योजना, नारी शक्ती योजना, कारागिरांसाठीच्या विश्वकर्मा योजना आदींची सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो, याची नागरिकांना जाणीव करून दिली गेली.
या शिबिरासाठी स्वप्नाली कदम, रेखा मित्तल, डॉ. वर्षा खानविलकर, डॉ. प्रज्ञा बापट, डॉ़. मनिषा अनारसे-बनकर, रोहिणी विभूते, महेश कामजू, दीपा गोडबोले, परेश अमृतकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हिंदुस्थान समाचार
