रत्नागिरी, 21 ऑक्टोबर : गोवा येथे ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या ३७व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिलांचा प्रत्येकी १५ जणांचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पायल पवार या राष्ट्रीय खो-खोपटूची निवड झाली आहे.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी केली. काही दिवसांपूर्वी धाराशीव येथे झालेल्या निवड चाचणीतून संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली होती. संघातील निवड झालेल्या खेळांडूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र संघात तगडे खेळाडू सहभागी असून, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करतील असा विश्वास डॉ. चंद्रजित जाधव यांनी व्यक्त केला.
महिलांचा संघ असा : प्रियांका भोपी, पूजा फरागडे, रूपाली बडे, रेश्मा राठोड (सर्व ठाणे). किरण शिंदे, गौरी शिंदे, ऋतुजा खरे, संपदा मोरे (सर्व धाराशीव). काजल भोर, प्रियांका इंगळे, दीपाली राठोड (सर्व पुणे). निशा वैजाळ (नाशिक), प्रीती काळे (सोलापूर), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी). राखीव खेळाडू : स्नेहल जाधव (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशीव), वैष्णवी पोवार (कोल्हापूर). प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक जयांशू पोळ (जळगाव), व्यवस्थापिका सुप्रिया गाढवे (धाराशीव).
