सातारा, 17 फेब्रुवारी : येथील कृष्णानगर परिसरातील श्री आनंद नटराज व श्री शिवकामसुंदरी देवी यांच्या कृपेने तसेच श्री कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती महास्वामी तसेच कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व सध्याचे पिठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या पूर्णांग्रह आणि शुभ आशीर्वादाने श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सव रुद्र संगीत आणि नृत्यांजली सेवा याद्वारे संपन्न होणार आहे.
बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 दरम्यान महाशिवरात्री महोत्सवामध्ये रुद्र अनुष्ठानचेही आयोजन करण्यात आले आहे. या महाशिवरात्री महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री आनंद नटराज व श्री शिवकाम सुंदरी देवी तसेच परमपूज्य महास्वामी कडून कृपागृहीत व्हावे अशी मंदिराचे विश्वस्त आणि महाशिवरात्री महोत्सव समितीचे वतीने विनंती करण्यात आली आहे.
या महाशिवरात्री महोत्सवांतर्गत संगीत व नृत्यांजली सेवेच्या कार्यक्रमात मंदिरातील श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिराचे रंगमंचावर दि.28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत सौ.उषा शानभाग व सहकलाकारांचे भजन होऊन सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत पुणे येथील गुरु मधुरा देशपांडे यांची कथ्थक नृत्य सेवा सादर होणार आहे.
गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सातारा येथील डब्ल्यू नोट गिटार क्लासेसचे प्रतीक सदामते व त्यांच्या शिष्यांचा गिटार वादनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. एक मार्च शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ठाणे येथील नृत्यांजली संस्थेच्या सौ .लता राजेश व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील सूक्ष्मि कथक स्टुडिओचे सुनिता जमदाडे यांचा कथ्थक नृत्य सेवा संपन्न होणार आहे .
रविवार दिनांक 3 मार्च रोजी पुणे येथील विद्या दूलीपाला आणि सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे सोमवार दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील गुरु डॉ. आसावरी रहाळकर व सहकलाकारांची कथक नृत्य सेवा संपन्न होणार आहे .मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता निपाणी येथील त्रिनेत्रा डान्स ग्रुपच्या रोहित माने,श्रेयल शहा व स्नेहाराणी लाटकर यांची भरतनाट्य नृत्य सेवा संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील गुरु अंजली बागल यांच्या मोक्ष स्कूल ऑफ डान्स च्या कलाकार भरतनाट्यम सेवा सादर करणार आहेत .गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी पुणे येथील तालांक डान्स अकादमीच्या भक्ती नाईक आणि शिष्यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.
शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्री रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत सातारा येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या कलाकारांचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व गायन सेवा संपन्न होणार आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत नटराज नृत्यकला शाळा साताराच्या गुरु आचल घोरपडे व त्यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम सादर होऊन सायंकाळी आठ ते दहा या वेळेत मुंबई येथील आचार्य रत्न शंकर नारायण आणि ग्रुपचे नाद कौस्तुभम हे तालवाद्य ..कुटचेरी हा आगळावेगळा वादन प्रकार सादर होणार आहे.
दरम्यान धार्मिक कार्यक्रमांमध्ये बुधवार दि.6 मार्च रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत अनुज्ञा, विघ्नेश्वर पूजा, प्रधान संकल्प व ग्रामदेवता पूजन होऊन गणपती होम स्वस्ति पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध,नवग्रह होम होऊन आरती व प्रसाद वितरण होणार आहे. गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत एकादशी कलश स्थापना होऊन लघुरुद्र , जपक्रमाचना होणार आहे.
8 मार्च रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत लघुण्यास, एकादशी रुद्र जप,लघुरुद्र होम व पूर्णाहूती होऊन महामंगल आरती करून कलश यात्रा काढून श्री मूलनाथेश्वराच्या पिंडीस कलश महाभिषेक केला जाणार आहे .यावेळी अलंकार, नैवेद्य, आरती व प्रसाद वितरण होणार असून महाशिवरात्री निमित्त रात्री आठ ते 11 या वेळेत 8 मार्च रोजी शुक्रवारी कलश स्थापना, लघुरुद्र ,जप होऊन श्री नटराज पाचू पिंडीस कलश्याभिषेक केला जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी उघडे राहणार असून महाशिवरात्रीला रात्री दहा वाजल्यापासून शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी पाच पर्यंत महाशिवरात्री जागरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये नटराज मंदिर ट्रस्ट व नटराज महिला मंडळ आणि योगदा सत्संग यांच्या सौजन्याने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश भाग व विश्वस्त मंडळांनी केले आहे.
