वॉशिंग्टन डीसी, 19 जुलै (हिं.स.)
फ्रीस्टाइल
बुद्धिबळ ग्रँड स्लॅममधील ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाइसीची स्वप्नवत वाटचाल अमेरिकेच्या
लेव्हॉन अॅरोनियनने रोखण्यात यश मिळवले आहे. उपांत्य फेरीत अर्जुनला ०-२ असा
पराभव सहन करावा लागल्यामुळे त्याचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. फ्रीस्टाइल
ग्रँड स्लॅमच्या अंतिम चार टप्प्यात पोहोचणारा पहिला भारतीय ठरलेला एरिगाइसी अॅरोनियन विरुद्धच्या सामन्यात आपला
प्रभाव पाडू शकला नाही.
अॅरोनियनला
पुढच्या फेरीत जाण्यासाठी फक्त एका बरोबरीची आवश्यकता होती. पण त्याने सुरुवातीपासून
थोडासा फायदा मिळवण्यासाठी चतुराईने खेळ केला. सामना संतुलित स्थितीत येताच तो
बरोबरीच्या दिशेने वाटचाल करत होता. पण सामन्यात टिकून राहण्यासाठी विजयाची
आवश्यकता असलेल्या अर्जुनने अनावश्यक जोखीम पत्करली आणि ही चूक त्याला महागात पडली.
या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रीस्टाइल टूर लीडर आणि जागतिक क्रमांक १ मॅग्नस
कार्लसन आणि जागतिक क्रमांक २ हिकारू नाकामुराला अॅरोनियनने पराभूत केले होते. अॅरोनियनने
दोन्ही क्लासिकल गेम टायब्रेकशिवाय जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूला पराभूत करत आपली
भक्कम कामगिरी सुरू ठेवली.
विजेतेपदाच्या
शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या आर. प्रज्ञानंदाने आठव्या स्थानासाठी प्लेऑफमध्ये
जर्मनीच्या विन्सेंट कीमरचा पराभव केला. प्रज्ञानंदाने पहिला गेम बरोबरीत सोडवला
आणि परतीच्या गेममध्ये कीमरला १.५-०.५ असा पराभव सहन करावा लागला.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
