नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. मात्र इंडोनेशिया येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण सलग तिसऱ्यांदा एसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
दरम्यान आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जय शाह यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष श्रीमान शम्मी सिल्वा यांनी दुसऱ्यांदा जय शाह यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता आणि या नामांकनाला एसीसीच्या सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. जय शाह यांनी जानेवारी २०२१ मध्ये बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्याकडून एसीसीची सूत्रे हाती घेतली होती. एसीसीचा कारभार सांभाळणारे ते सर्वांत तरूण अध्यक्ष ठरले. दरम्यान जय शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपूर्ण आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा प्रचार आणि विकास करण्यात लक्षणीय एसीसीने चांगली प्रगती केली. २०२२ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेने ट्वेंटी-२० आणि मागील वर्षी वन डे प्रकारांत आशिया चषकाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.
