सोलापूर, 4 फेब्रुवारी : भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नमो चषक अंतर्गत रविवारी शहरातून नमो दौड उत्साहात झाली. २६ शाळांतील तब्बल २ हजार ८१३ विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर उत्तर विधानसभेतर्फे भाजयुमो शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही दौड झाली.
चार हुतात्मा चौकात या दौडीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तेथून ही दौड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, छत्रपति श्री शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, लोकमान्य टिळक चौक, मधला मारुती, महात्मा श्री बसवेश्वर महाराज चौकमार्गे कन्ना चौकात आली. दौडीच्या एकूण ३.५ किलोमीटर परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा उत्साह दिसून येत होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नमो टी-शर्ट देण्यात आले होते. तसेच सहभागी शाळांना चषक आणि सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
