नवी दिल्ली, 25 सप्टेंबर (हिं.स.) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ ३० सप्टेंबरपासून कानपूरमध्ये मालिकेला खेळण्यास सुरुवात करणार आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, श्रेयस अय्यरने रेड-बॉल क्रिकेटमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. त्याने यूकेमध्ये शस्त्रक्रिया केली आहे आणि त्यातून तो बरा होत आहे. अलीकडेच त्याला रेड-बॉल सामन्यांमध्ये खेळण्यात समस्या येत आहेत. तो या कालावधीचा वापर त्याचा फिटनेस सुधारण्यासाठी करणार आहे. श्रेयसच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने त्याची इराणी कपसाठी त्याची निवड केलेली नाही.
ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेत तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा हे क्रिकेटपटूदेखील सहभागी होणार आहेत. तिलक आणि अभिषेक हे युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये सहभागी होत आहेत. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. म्हणजेच संघ २८ सप्टेंबरपर्यंत यूएईमध्येच राहणार आहे. या कारणास्तव, तिलक आणि अभिषेकसह हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. हर्षित आणि अर्शदीप हे देखील आशिया कप संघाचा भाग आहेत. पण या दोन्ही क्रिकेटपटूंना आतापर्यंत फक्त एका सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. अभिषेक चाेगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
