रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली, क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत रायगड जिल्ह्याला राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद देण्यात आले आहे. यामध्ये बॉक्सिंग, खो-खो, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, कबड्डी आणि कुस्ती या ६ खेळांचा समावेश असून, विविध वयोगटांतील स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
त्याअंतर्गत १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा दि. २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली-संगम, अलिबाग येथे पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील ८ महसूल विभाग व १ राज्य क्रीडा प्रबोधिनी यांचे संघ सहभागी होणार असून, सुमारे ३०० खेळाडू, मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक यात सहभागी होतील. स्पर्धांमधून विजेते खेळाडू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, ही स्पर्धा त्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची संधी ठरणार आहे. बॉक्सिंग रिंगचे उद्घाटन व उत्तम तयारी: राज्यस्तर स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेहूली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये नव्याकोऱ्या बॉक्सिंग रिंगची स्थापना करण्यात आली आहे. ही रिंग तालुका संकूल समितीच्या माध्यमातून उभारण्यात आली असून, राज्यभरातून येणाऱ्या बॉक्सर्ससाठी उत्तम दर्जाच्या खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळा 26 सप्टेंबर रोजी: या राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली-संगम, अलिबाग येथील भव्य पटांगणात संपन्न होणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी ही स्पर्धा गौरवाची बाब असून, खेळ व खेळाडूवृत्तीला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंना आपला कौशल्य व ताकद सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली असून, प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून बॉक्सिंगचा थरार अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
