लातूर, 3 डिसेंबर (हिं.स.) : उदगीर येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेची सुरुवात झाली असून त्याचे उदघाटन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आज येथे केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्यावतीने तालुका क्रीडा संकुल, मेन रोड, उदगीर येथे ०२ ते ०५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
उद्घाटन प्रसंगी राज्यातून विविध विभागांमधून आलेल्या खेळाडूंनी विभागाचे ध्वज घेऊन संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.
उदगीर शहर हे शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यात अग्रेसर आहे, तथापि आता उदगीरमध्ये विविध खेळांच्या पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने आता दर्जेदार खेळाडू तयार करणारे शहर म्हणून नावलौकीक मिळवेल यात शंका नाही असे सांगुन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी उदगीरचे तहसिलदार रामेश्वर गोरे, जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे श्री परवेझ कादरी यांनीही मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. यावेळी त्यांनी प्रस्ताविकात उदगीर शहरात क्रीडा संस्कृती रुजावी म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
यांचे प्रयत्न आहेत. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून या राज्यस्तरीय स्पर्धा येथे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या स्पर्धेला उदगीरकरांनी राज्यातील विविध विभागातील आलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवून प्रात्साहन द्यावे असे आवाहन केले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या या क्रीडापटुंची निवास व्यवस्था जयहिंद पब्लीक स्कुल, उदगीर, आणि मुलींची निवास व्यवस्था शिवाजी महाविद्यालय, उदगीर यांचे वसतीगृह आणि पंचांची निवास व्यवस्था धन्वंतरी महाविद्यालय, उदगीर येथे करण्यात आली असल्याचे सांगितले. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी उदयगिरी महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल अध्यक्ष व सचिव यांचे आभारही त्यांनी मानले.
या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी, पुणे व कोल्हापूर अशा एकुण नऊ विभागातून ३०६ खेळाडू, १८ संघव्यवस्थापक, २० तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, यांनी मानले.
हिंदुस्थान समाचार
