जकार्ता, 26 जुलै (हिं.स.)
इंडोनेशियातील
सोलोमध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तन्वी
शर्मा आणि वेन्नाला कलागोटला यांना महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव सहन करावा
लागला. या पराभवामुळे तन्वी आणि वेन्नाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमचभारताने महिला एकेरीत दोन पदके मिळवली आहेत.
दोन
बिगरमानांकित बॅडमिंटनपटूंमधील पहिल्या उपांत्य फेरीत चीनच्या सी या लिऊने
वेनालाचा ३७ मिनिटांत २१-१५, २१-१८ असा पराभव केला. पहिल्या सामन्यात लिऊने १४-७ अशी आघाडी घेतली
होती. त्यानंतर वेनालाने पुढील ११ पैकी आठ गुण जिंकून अंतर कमी केले. पण लिऊने चार गुणांची विजयी मालिका सुरू
ठेवत पहिला गेम जिंकला. दुसरा गेम १५-१४ पर्यंत चुरशीचा होता. त्यानंतर लिऊने
माघार घेतली आणि अखेर तिच्या चौथ्या मॅच पॉइंटमध्ये रूपांतर करून अंतिम फेरीत आपले
स्थान निश्चित केले.
दुसऱ्या
उपांत्य फेरीत ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तन्वीने
महत्त्वाच्या क्षणी अनेक चुका केल्या आणि तिला त्याची किंमत चुकवावी लागली. तिला
आठव्या मानांकित चीनच्या यिन यी किंगकडून ३५ मिनिटांत २१-१३, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
