नाशिक, 26 जुलै (हिं.स.) : ब्रिटिश उच्चायोग, मुंबई येथील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयात निमा पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही देशांतील उद्योगांसाठी सहकार्य, परस्पर गुंतवणुकीच्या संधी, आणि भविष्यातील औद्योगिक भागीदारी सह युके येथील उद्योजक नाशिक येथे मेगा औद्योगिक गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात आले व यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान नाशिकच्या औद्योगिक क्षमतेचा आढावा घेण्यात आला आणि नाशिक व यूके कंपन्यांमध्ये संभाव्य सहकार्य, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मेगा गुंतवणूक प्रकल्प आण्यासाठी चर्चा झाली. यूके सरकारच्या औद्योगिक धोरणात नमूद केलेल्या आठ प्राधान्य क्षेत्रांमध्ये नाशिकमधील उद्योजकांना संधी उपलब्ध होऊ शकते, हे अधोरेखित करण्यात आले. विशेषतः संरक्षण, अवकाश, आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाशिकची वाढती ताकद याकडे ब्रिटिश प्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले. नाशिकच्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि जीवनमान या बाबींवर चर्चा करताना दुसऱ्या औद्योगिक विकासाचा संदर्भ देऊन नाशिकच्या तुलनात्मक फायद्यांचा उल्लेख झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेप्रमाणेच पायाभूत प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गा व सुरत चेन्नई एक्सप्रेस हाईवे मधे नाशिक चा असलेला समावेश आणि विमानतळ सुविधा येथे उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यास कशी मदत करतील यावर निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी लक्ष वेधले. व्हीडीई (VDE) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांना गुंतवणुकीसाठी महत्त्वाची स्थाने म्हणून ओळख दिली असल्याचे निर्दशनास आणून दिले. भविष्यातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, पुढील टप्प्यात काही कृती योजनाही निश्चित करण्यात आल्या. यामध्ये दोन्ही संस्था देऊ करत असलेल्या सेवांची माहिती सामायिक करणे, तसेच UK सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती निमा प्रतिनिधींना दिली. नाशिकमधून होणाऱ्या IT, डेटा सेंटर, नागरी विमानांसाठी MRO सेवा अशा प्रकल्पांमध्ये यूके कंपन्यांसोबत भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या शक्यता तपासण्यात येतील असे ब्रिटिश हाई कमिशनच्या गुंतवणूक संचालक सिद्धीका बॅनर्जी यांनी सांगितले. भविष्यातील गतिशीलता, ऑटोमोटिव्ह, प्रगत अभियांत्रिकी, सर्जनशील उद्योग, डिजिटल तंत्रज्ञान, जैविकशास्त्र, अन्न प्रक्रिया उद्योग, फार्मसी आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्याचे दरवाजे खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती बॅनर्जी यांनी दिली. तसेच दोन्ही देशातील संबंधित कंपन्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्याची योजना निर्यात-आयात उपसमितीचे अध्यक्ष श्री. हर्षद ब्राम्हणकर यांनी सुचवली. दोन्ही संस्थांनी औद्योगिक भागीदारीला चालना देण्यासाठी संवाद सुरू ठेवण्याचे आणि माहितीची देवाणघेवाण सातत्याने करण्याचे ठरवले. नाशिकचा विकास, उद्योग विस्तार व मोठी गुंतवणूक, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे या बैठकीचे मुख्य सूत्र होते. या बैठकीस निमा अध्यक्ष आशिष नहार, मानद सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष (LSI) किशोर राठी, उपाध्यक्ष (SSI) मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, निर्यात-आयात उपसमितीचे अध्यक्ष श्री. हर्षद ब्राम्हणकर, कैलास पाटील, सी.एस. सिंग, नूपुर बेंडले, ऋचा आदी उद्योजक उपस्थित होते.ब्रिटिश उच्चायोग शिष्टमंडळात गुंतवणूक संचालक सिद्धीका बॅनर्जी, वरिष्ठ गुंतवणूक सल्लागार लिनू नोबल कुरियन आणि बुरझिन लुथ उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
