अॅडलेड, १६ डिसेंबर, (हिं.स.) २०२६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी करण्यासाठी सर्बियन टेनिस दिग्गज नोवाक जोकोविच अॅडलेड इंटरनॅशनलमध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेद्वारे जोकोविच आपल्या ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी आणि विक्रमी २५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी आपला प्रयत्न सुरू करणार आहे.
अॅडलेड इंटरनॅशनल, संयुक्त एटीपी-डब्ल्यूटीए स्पर्धा, १२ ते १७ जानेवारी दरम्यान आयोजित केली जाईल. त्यानंतर वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेले ऑस्ट्रेलियन ओपन १८ जानेवारी रोजी मेलबर्न पार्क येथे सुरू होईल.
जोकोविचने २०२३ मध्ये आपले शेवटचे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले होते आणि त्यानंतर त्याने दौऱ्यावरील त्याच्या सामन्यांची संख्या कमी केली आहे. पण त्याने या वर्षी जिनेव्हा आणि अथेन्समध्ये विजेतेपद जिंकून आपली क्षमता दाखवली आहे.
टूर्नामेंट आयोजकांनी सांगितले की, अॅडलेड इंटरनॅशनलमध्ये पुरुष गटात जोकोविचसोबत जॅक ड्रेपर, जोआओ फोन्सेका, टॉमी पॉल आणि स्टेफानोस त्सित्सिपास सामील होतील.
ऑस्ट्रेलियन ओपन विजेती मॅडिसन कीज महिलांच्या स्पर्धेचे नेतृत्व करेल. तिच्यासोबत जगातील अव्वल १० टेनिसपटू जेसिका पेगुला, मिरा अँड्रेयेवा आणि एकटेरिना अलेक्झांड्रोवा असतील.
स्पर्धा संचालक अॅलिसिया मोलिक म्हणाल्या, अॅडलेड इंटरनॅशनलच्या २०२६ च्या आवृत्तीत जागतिक टेनिस कॅलेंडरवर स्पर्धेची वाढती प्रतिष्ठा दिसून येईल, ज्यामध्ये एटीपी आणि डब्ल्यूटीए टूर्समधील जागतिक दर्जाच्या टेेनिसपटूंचा समावेश असणार आहे
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
