ठाणे, 8 जानेवारी (हिं.स.) : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ आमदार निरंजन डावखरे यांचे समन्वय प्रतिष्ठान व ठाणे जिल्हा जलतरण संघटनेने रविवारी आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहावयास मिळाल्या. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाण्यातील कै. मारोतराव शिंदे तरण तलावामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, उपाध्यक्ष रमेश आंब्रे, माजी नगरसेविका स्नेहा मोरे, भाजपा शैक्षणिक प्रकोष्टचे सहसंयोजक सचिन मोरे, अनुसुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पारछा, वैभव देशमुख, कु. मधुर डावखरे, कु. विहान डावखरे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसवाटप करण्यात आले.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये भावीन तळेकर, मुलींमध्ये समिधा मोरे, १४ वर्षाखालील मुलांमध्ये शुभम जोशी, मुलींमध्ये आकांक्षा दुबे, १२ वर्षांखालील गटात मुलांमध्ये अथर्व घाग, मुलींमध्ये आयुषी आखाडे, १० वर्षांखालील गटात मुलांमध्ये कबीर सोनोले, मुलींमध्ये निधी सामंत, ८ वर्षांखालील गटात मुलांमध्ये दक्ष शाह, मुलींमध्ये लक्ष्मी सिरापारापू, ६ वर्षांखालील गटात मुलांमधील नील नाकती, मुलींमध्ये देविका खरुडे आदींनी विजेतेपदे पटकावली. या स्पर्धेत एनएमएसए, स्टारफिश, ठाणे क्लब, आरआरएसए डीजी, वेव्ह, डॉल्फिन, ओझोन, वायएमसीए, एमएसपी आदी क्लबच्या खेळाडूंना यश मिळविता आले. विजेत्यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले.
आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून अतुल पुरंदरे, कैलास आखाडे, रवी काळे, यांच्या नियोजनातून जलतरण स्पर्धा पार पडली.
हिंदुस्थान समाचार
