नवी दिल्ली , 24 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी (दि.२४) याची पुष्टी केली आहे. तसेच पाकिस्तानच्या जागी कोणता संघ या जागतिक स्पर्धेत सहभागी होईल, याची घोषणा लवकरच केली जाईल, असे सांगितले आहे. ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे आयोजन २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे होणार आहे.
एफआयएचने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही याची पुष्टी करतो की पाकिस्तान हॉकी महासंघाने एफआयएचला कळवले आहे की पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक २०२५ साठी पात्र ठरलेला त्यांचा संघ अखेरीस या स्पर्धेत भाग घेणार नाही. पाकिस्तानच्या जागी कोणता संघ सहभागी होईल, याची घोषणा लवकरच केली जाईल.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. यावर्षी २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर भारताने स्पष्ट केले होते की, कोणत्याही क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला दौरा करणार नाही.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
