– छत्रपती शाहू महाराजांविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार
मुंबई कोल्हापूरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.
पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलले जाते असे सांगत खाडे यांनी स्वाभिमानासाठी मैदानात उतरल्याचे म्हटले होते. खाडे उमेदवारी अर्ज दाखल करणार ही घोषणा केल्यानंतर अनेक दिवसांपासून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरला आणि बंडखोरी केली.
बाजीराव खाडे हे गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. युवक काँग्रेसपासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या शिवाय विविध राज्यांची जबाबदारी त्यांनी पाड पाडली आहे. खाडे हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या दीड वर्षापासून त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. मात्र पक्षाने शाहू महाराजांना उमेदवारी दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे. ओबीसी, वंचित पाठोपाठ एमआयएमने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे.
