* सचिन तेंडुलकरकडून हटके शुभेच्छा
मुंबई, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागला आयसीसीकडून गौरविण्यात आले आहे. आयसीसीने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सेहवागच्या नावाचा समावेश केला आहे. याबद्दल मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले असून सेहवागला खास हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवागने या सन्मानाबद्दल आयसीसीचे आभार मानले आहे. तसेच, माझ्यासाठी सदैव शुभेच्छा देणाऱ्या प्रार्थना करणाऱ्या माझ्या चाहत्यांना, मित्रांना आणि सहकारी खेळाडूंनाही धन्यवाद देतो, असे सेहवागने या सन्मानाबद्दल बोलताना म्हटले आहे.
सेहवागसह भारतीय महिला संघाची माजी फलंदाज तथा कर्णधार डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अरविंद डी सिल्वा यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे.
सचिन तेंडुलकरने या सन्मानाबद्दल तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यात, सेहवागचे विशेष अभिनंदन केले आहे. सन्मानपात्र तीन खेळाडू हे खूप वेगळे असून वेगवेगळ्या कालखंडात क्रिकेट खेळलेले आहेत. या तिघांनी आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान मिळवले ही आनंदाची बाब आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू डायना एडुल्जी, ज्या भारतातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक होत्या. तर, श्रीलंकेला ‘९६ च्या विश्वचषक’ जिंकून देण्यात अरविंद डिसल्वाची मोलाची भूमिका राहिली आहे. आणि अर्थातच, माझा मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार विरेंद्र सेहवाग.. असे म्हणत सचिनने सेहवागचं खास अभिनंदन केलं. तसेच, विरुने कसोटी सलामीवीर म्हणून फलंदाजीची पूनर्रचनाच केली आणि ‘गो’ या शब्दापासून सर्वच गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली, असे ट्विट सचिनने केले आहे.
विरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्या अगोदर ७ भारतीय खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यात सचिन तेंडुलकरला २०१९ मध्ये हा बहुमान मिळाला. राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सुनिल गावस्कर, बिशनसिंह बेदी, विनू माकंड आणि कपिल देव यांचा या क्लबमध्ये सहभाग आहे.
दरम्यान, विरेंद्र सेहवाग हा २०११ च्या विश्वविजयी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज होता. आपल्या फलंदाजीने त्याने प्रसिद्ध जलदगती गोलंदाजांच्याही मनात भीती निर्माण केली होती. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये त्याने भारतासाठी मोलाची भूमिका बजावली. तर, अनेक सामन्यात सेहवागच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये सेहवागचं नाव घेतलं जातं.
सेहवागची कारकीर्द
सेहवागने कसोटी सामन्यांतही जोरदार प्रदर्शन केलं आहे. कसोटी सामन्यात मुल्तानच्या मैदानावर पाकिस्ताविरुद्ध त्रिशतकाचा विक्रमही सेहवागने केला. कसोटी क्रिकेटमध्ये १०४ सामन्यात सेहवागने ८५८६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये, २३ शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टीम इंडियासाठी २५१ एकदिवसीय सामन्यांत ८२७३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये, १५ शतक आणि ३८ अर्धशतकांचा ठोकले आहेत.
डायना एडुल्जी यांची कारकीर्द
डायना एडुल्जी यांनी आयसीसीने हॉल ऑफ फेमच्या क्लबमध्ये सामिल केलं आहे. डायना यांनी देशाचे १७ वर्षे प्रतिनिधित्व केले होते. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारतासाठी २० कसोटी, ३४ वनडे सामने खेळल्या. १९९३च्या वर्ल्डकपनंतर डायना यांनी निवृत्ती घेतली होती.
वर्ल्डकप जिंकणारा अरविंदा
श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये अरविंदा डी सिल्वाचा समावेश होतो. त्याने लंकेकडून ९३ कसोटी, ३०८ वनडे मॅच खेळल्या. २००३ च्या वर्ल्डकपनंतर अरविंदाने निवृत्ती घेतली होती. त्याच्या नावावर १५ हजार ६४५ आंतरराष्ट्रीय धावा आणि १३५ विकेट आहेत. १९९६ मध्ये लंकेने वर्ल्डकप जिंकला होता. या विजयात अरविंदाची महत्त्वाची भूमिका होती. तेव्हा भारताविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अर्धशतक, तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली होती.
हिंदुस्थान समाचार
