सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारले जात आहे. स्मारकाजवळ मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर सुमारे १५२ फुटांचा वॉच टॉवर उभारला जात आहे. या कामासाठी १४ कोटी २४ लाख ९२ हजार २३८ रुपयांचा निधी मंजूर असून त्यातील उर्वरित तीन कोटींचा निधी आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वितरित केला आहे.विद्यापीठात अहिल्यादेवींचा २१ फुटी ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्याठिकाणी बारव, दीपमाळ, खुले थिएटर, उद्यान, कारंजे देखील केले जात आहेत. वॉच टॉवर व पुतळ्यासह अन्य कामांसाठी शासनाने सव्वाचौदा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी नऊ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी यापूर्वीच मिळाला आहे.आता राहिलेल्या कामासाठी तीन कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. जुलैअखेर काम पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात स्मारकाचा लोकार्पण सोहळा करण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू आहे. या सोहळ्यासाठी विद्यापीठाने यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तीन कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देताना या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता भासणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याशिवाय कामाची प्रगती व खर्चाचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कुलसचिव आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडे सादर करावा, असेही निर्णयात नमूद आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
