रत्नागिरी : आज दुपारी अचानक राजापूरच्या जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रात भरतीचे पाणी शिरल्याने तेथे उभी करून ठेवलेली वाहने पाण्यावर तरंगु लागली.
या ठिकाणी गतवर्षी गाळ उपसा केल्यापासुन भरतीचे पाणी भरत आहे. गतवर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी राजापूर पालिका प्रशासनाने सुचना फलक लावला होता. मात्र यावर्षी अद्यापही सुचना फलक न लावल्याने व नदीपात्रात जाणारा रस्ताही बंद न केल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अमावास्या आणि पौर्णिमेला समुद्राला भरती येते. त्यामुळे जैतापूर खाडीचे पाणी अर्जुना आणि कोदवली नदीपात्रात शिरते. बुधवारी दुपारी अचानक भरतीचे पाणी वाढू लागले आणि खर्ली नदीपात्र पाण्याने भरून गेले. या ठिकाणी एरवी नदीपात्र कोरडे असल्याने वाहने पार्क केली जातात. मात्र बुधवारी अचानक भरतीचे पाणी शिरल्याने वाहने नदीपात्रात अडकली आणि पाण्याचा जोर वाढताच ती तरंगू लागली.
काही स्थानिक नागरिकांनी ही वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
