अमरावती, समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असून त्यासाठी स्पेशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान,१७ आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळात सण,उत्सव,सभा,मिरवणुका तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील नागरिक व विशेष करून युवा वर्ग सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले मत-मतांतरे ,भावना व्यक्त करताना किंवा सोशल मीडियावर कोणीतरी व्यक्त केलेल्या विचारांना समर्थन किंवा विरोध दर्शवितांना दिसून येतात. परंतु सोशल मीडियावर व्यक्त केलेले मत हे केवळ व्यक्तिगत असून सुद्धा त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांचा परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेले आहे. सोशल मीडियावर बहुतांशी वेळेस,भ्रामक जाहिराती ,अफवा,बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याने सुद्धा समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पोलीस आयुक्त-नविनचंद्र रेड्डी व पोलीस उपायुक्त-कल्पना बारावकर यांचा मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक-कल्याणी हुमणे यांच्या नेतृत्वात एक अधिकारी व दोन पोलीस अंमलदारांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आले आहे. सदर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घडणाऱ्या घडामोडींवर अविरतपणे लक्ष ठेवण्याचे कामकाज सुरू आहे. या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून मागील काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युजर्सची यादी तयार करण्यात आली व त्यांच्याद्वारे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कंटेंडवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मॉनिटरिंगदरम्यान एकूण १७ आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित सोशल मीडियाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या बाबत योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. अमरावती शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की,सण,उत्सव,सभा,मिरवणुका तसेच लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगाने सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये तसेच आपणास याप्रकारची पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद न देता तात्काळ सायबर पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त-नविनचंद्र रेड्डी यांनी दिली.
