
डोंबिवली, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : अमेरीकेतील ह्युस्टन शहरातील ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव साजरा केला. गेली ४७ वर्षे हे मंडळ कार्यरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम करतात. महाराष्ट्र व मराठी संस्कृती परदेशातही टिकून राहावी आणि येणाऱ्या पिढीला त्याची ओळख व्हावी या उद्देशाने मंडळ कार्यरत आहे.
या वर्षी मंडळाच्या मोरया ढोल ताशा पथकाला १० वर्षे पूर्ण झाली. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचे ”मोरया ढोल ताशा पथक”, ३ ढोल, १ ताशा आणि १ ध्वज असलेल्या मोजक्याच अनुभवी व हौशी मंडळींनी तयार केले होते. आज ही संख्या ३० ढोल, १० ताशा, ३५ झांजा आणि ३ ध्वज अशी आहे. ”मोरया” मध्ये अगदी सुरुवातीला ५ सदस्य होते. आता ८० सदस्य सहभागी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत या मंडळात महिलांच्या सहभागात वाढ झाली आहे. या वर्षी संघात ४० मुले आहेत. गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजवण्याची परंपरा हा उत्सवाचा अंगभूत भाग आहे.
मुलांसह ही टीम गेल्या ३ महिन्यांपासून ४३-४५ अंश सेल्सिअस तापमानात सराव करत आहे. आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू आहे. अमेरिकेत प्रथमच ४५ मुलांनी गणपतीची मिरवणूक काढली, वय वर्ष ५ पासून लहान मुले सहभागी झाली होती.
हिंदुस्थान समाचार
