वर्धा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गणेशपूर येथे 16 ते 22 मार्च या कालावधीत आयोजित सात दिवसीय शिबिरांतर्गत ‘लोकशाहीचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चेत राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक डॉ. बालाजी चिरडे म्हणाले की ग्रामव्यवस्था मजबूत असेल तर लोकशाही मजबूत होईल. ते म्हणाले कि ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपली भूमिका बजावली पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. यावेळी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी ही मनोगत व्यक्त केले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता जनजागृती या विषयावर रॅली काढण्यात आली. गणेशपूर येथील प्राथमिक शाळेपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘विकासाच्या प्रत्येक वाटेवर, स्वच्छता आमचा नारा आहे’, ‘प्रत्येक नागरिकाचे एकच स्वप्न, स्वच्छ भारत’, ‘स्वच्छता हेच सर्व रोगांवर औषध आहे’ अशा घोषणा दिल्या व गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक डॉ. बालाजी चिरडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवसिंह बघेल व डॉ. हेमचंद्र ससाने, शालेय विद्यार्थी व नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
