सुनिल खराटे यांची मागणी मुख्य सचिवांकडे तक्रार
अमरावती, देशातील शहरी क्षेत्राचे व्यवस्थापन करण्याची व स्थानिक प्रशासन म्हणून काम पाहण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर असते. त्यामुळे केंद्र सरकारने महापालिका आयुक्त हे पद आयएएस संवर्गाखाली आणले असल्याने या पदावर कोणत्याही बिगर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करु नये, अशी तरतुद केली आहे. परंतु अमरावती महापालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास पवार हे त्याला अपवाद ठरले असून ते आयएएस संवर्ग अधिकारी नसताना केवळ राजकीय शिफारशींच्या जोरावर राज्य शासनाने त्यांची अमरावती महानगरपालिकेच्या नियमित आयुक्तपदी नियुक्ती केली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावली पायदळी तुडवल्या आहे. या गंभीर प्रकारविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल खराटे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करून ही नियमबाह्य नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
महानगरपालिका आयुक्त हे पद भारतीय प्रशासकीय सेवा (संवर्ग) नियमावलीनुसार २०१८ व २०२३ मध्ये वेळोवेळी प्रकाशित केलेल्या आणि वास्तविक भारतीय प्रशासकीय सेवा ( संवर्ग ) नियमावली १९५४ च्या कलम ८ व ९ नुसार आयएएस अधिकाऱ्यांसाठी चिन्हांकित असलेल्या पदावर कोणत्याही बिगर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करु नये अशी तरतुद केंद्र सरकारने केली आहे. अपवादात्मक परिस्तितीत जर आयएएस अधिकारी उपलब्द न झाल्यास राज्य सरकार फक्त तीन महिने केंद्र सरकारकडून मंजुरी घेऊन बिगर आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करू शकतात. परंतु अमरावतीच् मनपाच्या प्रभारीआयुक्तपदी देविदास पवार यांना नेमणूक करताना राज्य शासनाने केंद् सरकारची कोणतीही मंजुरी धेतली नाही. अमरावती महानगरपालिका हे पद आयएएस अधिकाऱ्यासाठी चिन्हांकित असतांना राजकीय शिफारस असल्यामुळे पवार यांची पदस्थापना आयुक्त महानगरपालिका म्हणून करण्यात आली असल्याचे उघड होते.अशा बदल्या याअगोदरही राज्यात करण्यात आल्या होत्या यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले होते. यावेळी शासनाच्या मुख्य सचिवानी उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठकडे दाखल शपथपत्त्रामधे अशा शिफारीशी यानंतर केल्या जाणार नाही असे लेखी दिले. असे असताना जाणून बुजून कायदेशीर बाबी लक्षात न घेता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कायदेशीर अभिप्राय डावलून राजकीय शिफारस असल्यामुळे देविदास पवार यांची मनपा आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याचा आरोप आता होत आहे.
