सोलापूर, 28 नोव्हेंबर, ( हिं.स) – जिल्हा परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागाला काही दिवस मारुती फडकेंच्या रुपाने पूर्णवेळ शिक्षणाधिकारी लाभले. पण, ते वैद्यकीय रजेवर गेल्यानंतर अद्याप या विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. दुसरीकडे शालार्थ आयडी प्रस्तावाच्या मान्यता प्रकरणात प्राथमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना पकडले. त्यानंतर या विभागालाही शासनाकडून पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळालेला नाही.
विनाअनुदानित तथा टप्पा अनुदानावरील शाळांनी सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे शालार्थ आयडीसाठी पाठविलेल्या १९१ प्रस्तावांमध्ये उपसंचालकांनी त्रुटी काढल्या आहेत.पूर्वीच्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या काही मान्यतांवरही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. काही प्रकरणांची उपसंचालक स्तरावरून चौकशी सुरु आहे, पण त्यासंदर्भात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. असे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर त्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी पूर्णवळ शिक्षणाधिकाऱ्यांची गरज आहे. जिल्हा परिषदेकडून पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळावेत म्हणून शिक्षण आयुक्त स्तरावर पाठपुरावाही सुरु आहे. मात्र, अद्याप त्यासंदर्भात शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही.
हिंदुस्थान समाचार
