सोलापूर 7 ऑक्टोबर ( हिं.स) ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ याची प्रचिती शेतकऱ्यांना भूमिअभिलेख कार्यालयात येत आहे. तातडीची मोजणी तीन महिन्यात तर अतितातडीची मागणी दोन महिन्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, दोन्ही मोजणींसाठी किमान दोन-अडीच महिन्यांचा विलंब लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. स्वत:च्या मालकीची चार-पाच एकर जमीन, पण बांधासाठी वर्षानुवर्षे भावकीत किंवा शेजाऱ्यांशी भांडणे, अशी अनेक शेतकऱ्यांची स्थिती आहे. अनेकजण स्वत:ची शेती सोडून शेजारील जमिनीचा बांध आपल्याच हद्दीतील असल्याचे मानून वारंवार त्याठिकाणीच टोकराटोकरी करतो, अशीही उदाहरणे आहेत. त्याला वैतागून संबंधित शेतकरी वाद नको म्हणून भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज करतो. दुसरीकडे काही जागा मालक देखील अशाच प्रकारांना वैतागून किंवा आपल्या जागा किंवा शेतीच्या हद्द-खुणा फिक्स करून भविष्यातील कटकट दूर व्हावी म्हणूनही अनेकजण मोजणीसाठी अर्ज करतात. लवकर मोजणी होऊन सततच्या कटकटीतून मुक्तता मिळावी किंवा भविष्यातील कटकट उद्भवू नये म्हणून त्यांची घाई असते. पण या विभागाकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने अर्ज केल्यानंतरही साधी, तातडीची किंवा अतितातडीच्या मोजणीला खूपच विलंब लागतो आहे. त्याचा फटका संबंधित अर्जदारांना सोसावा लागतोय, अशीही वस्तुस्थिती आहे.
हिंदुस्थान समाचार
